पुणे – कर्मचाऱ्यांनीच केली अतिक्रमण विभागाची अडचण

110 सहायक अतिक्रमण निरीक्षकांना घरचा रस्ता

पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कामकाज अधिक प्रभावी व्हावे या उद्देशाने महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण विभागासाठी तब्बल 150 सहायक अतिक्रमण निरीक्षक सहा महिन्यांच्या मुदतीने नियुक्त करण्यात आले होते. मात्र, या अतिक्रमण निरीक्षकांकडून कारवाईला फाटा देत परस्परच हप्ते वसुलीचे दुकान लावण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाकडून दुसऱ्या सहामाहीत केवळ 40 सहायक अतिक्रमण निरीक्षकांनाच पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे शहरासाठी केवळ 14 अतिक्रमण निरीक्षक आहेत. त्यामुळे या विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. तर शहरात त्याचवेळी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढू लागल्याने प्रशासनावर कामाचा ताण येत होता. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण विभागाची कारवाई अधिक प्रभावी होण्यासाठी सुमारे 172 सहायक अतिक्रमण निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिक्रमण विभागात या जागा रिक्त असल्या तरी, त्या भरण्यासाठी अद्याप शासनाकडून मान्यता मिळालेली नसल्याने प्रत्येकी सहा महिन्यांच्या कराराने ही पदे भरण्यात आली. त्या अंतर्गत पहिल्या सहा महिन्यांसाठी प्रशासनाने सुमारे 160 जणांची नियुक्ती केली होती. मात्र, त्यातील केवळ 150 जणच प्रत्यक्ष कामावर रुजू झाले. त्यानंतर आता दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली जाणार होती.

मात्र, त्या पूर्वी अतिक्रमण विभागाने क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नेमलेल्या या कर्मचाऱ्यांनी कारवाईला फाटा देत पथारी व्यावसायिक तसेच अनधिकृत व्यावसायिकांविरोधातील कारवाई टाळण्यासाठी हप्ते घेण्यास सुरुवात केली. तसेच, त्यांना ज्या अपेक्षेने नेमण्यात आले. त्याप्रमाणे काम होत नसल्याचेही समोर आले. त्यामुळे प्रशासनाकडून या प्रकारांना आळा घालण्यासाठी या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, 150 पैकी 110 जणांना घरचा रस्ता दाखवित केवळ 40 सहायक अतिक्रमण निरीक्षकांनाच पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.