पुणे – तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मिरवणूक काढून त्याचे छायाचित्रीकरण केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या शिरगाव पोलीस चौकीत दाखल असलेल्या गुन्ह्यात कुख्यात गजा मारणे याच्या चार साथीदारांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.डी.निंबाळकर यांनी फेटाळला.
सचिन आप्पा ताकवले, अनंता ज्ञानोबा कदम, प्रदीप दत्तात्रय कंधारे आणि गणेश नामदेव हंडारे या चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी रोजी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून गुंड गजा मारणे याची सुटका झाली. त्यावेळी मारणे त्याच्या साथीदारांसह सार्वजनीक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेदायदा गर्दी जमवून फटाके वाजवून आरडा-ओरडा करत त्याचे चित्रीकरण केले. तसेच मास्क न लावता करोनाच्या नियमांचे उल्लंघन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मारणेसह 70 ते 80 जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी चौघांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला.
यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. सर्वजण सराईत आहेत. ताकवले याच्यावर चार, कदम याच्यावर आठ, कंधारे याच्यावर सात आणि हुंडारे याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. या चौघांनी रॅलीसाठी मनुष्यबळ, वाहनांची जुळवाजुळव आणि आर्थिक पाठपुरावा केल्याची शक्यता, या आणि गुन्ह्यातील इतर साथीदार कोण आहेत, याच्या शोधासाठी चौघांना अटक करणे गरजेचे आहे. त्यामुळे चौघांचा अटकपूर्व फेटाळण्याची मागणी ऍड. बोंबटकर यांनी केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी गजानन मारणे याने 25 फेब्रुवारी रोजी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर होऊन जामीन घेतला आहे.