पुणे – वाहतूक खोळंब्याला पीएमपीदेखील जबाबदार

कूचकामी सेवा : मध्यवस्तीसह उपनगरांतही कोंडी

– कल्याणी फडके

पुणे – शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसची अवस्था पाहता नागरिक खासगी वाहनांना प्राधान्य देतात. परिणामी, सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या “अफाट’ असते. अरुंद रस्ते, पायाभूत सुविधांची कमतरता, रखडलेली कामे, भर रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेस आणि वाहतुकीचा होणारा खोळंबा या समीकरणामुळे शहरामध्ये “पुणेकर’ वाहतूक विभागाला जबाबदार धरत त्यांच्यावर खापर फोडून मोकळे होतात.

संध्याकाळच्या वेळामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता शनिवार पेठ, रविवार पेठ या भागांमध्ये तर उपनगरांमध्ये सिंहगड रस्ता, नगर रस्ता, हडपसर, नगर रस्ता, चांदणी चौक, सातारा रस्ता या भागांमध्ये नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागतो.

“वीक-एंड’लाही गर्दी
शहरातील उपनगरांमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे “आयटी कंपन्या’ आणि “मॉल्स’मध्ये भर पडत आहे. हडपसर, खडकी, कोरेगाव पार्क यासारख्या भागांमध्ये खासगी कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कंपन्यांमधील बसेस, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक वाहने संध्याकाळी साधारण पाच ते सात या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतात. पर्यायाने सोमवार ते शुक्रवारी शहरांतील काही भाग “पॅक’ होऊन जातो. त्याचबरोबर दिवसेंदिवस नागरिकांची गर्दी खेचणाऱ्या मॉल्समुळे वाहतूक कोंडी देखील वाढत आहे. त्याचबरोबर उपनगरांमध्ये वसलेल्या मगरपट्टा सिटी, ऍमनोरा सिटी, नांदेड सिटी आदींमुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढत आहे. यासह सिझन्स, सेंट्रल, अभिरुची, ऍमनोरा, फिनीक्‍स, वेस्टर्न, कुमार पॅसिफिक आदीसह डी-मार्ट, बिग बझार सारख्या मॉल्समुळे शहरातील वाहतूक “वीक-एंड’ला “हाऊसफुल्ल’ होत आहे.

“पीक अवर्स’मध्ये हे रस्ते असतात “पॅक’
अभिनव महाविद्यालय चौक ते अलका टॉकिज चौक
आबासाहेब गरवारे कॉलेज ते एसएनडीटी कॉलेज
दशभुजा गणपती, मृत्युंजय मंदिर ते कर्वे पुतळा
राजाराम पूल ते धायरी
पुलगेट ते मगरपट्टा सिटी
वारजे ते हिंजवडी ताडिवाला रोड ते सीओईपी
संगमवाडी ते येरवडा
येरवडा ते वाघोली (नगर रोड)
बिबवेवाडी ते कात्रज
विश्रांतवाडी ते लोहगाव
पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर
चतु:श्रुंगी मंदिर ते सिंबायोसिस

सकाळी आणि संध्याकाळी “पीक अवर्स’मध्ये रहदारी नसेल, या अंदाजाने नागरिक वेळाचा अंदाज घेतात. अपेक्षित वेळेच्या अगदी तोंडावर रस्त्यावर उतरतात. जर नागरिकच इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी उशिरा रस्त्यावर उतरत असतील आणि पुढे त्यांना उशीर होत असेल. तर या परिस्थितीला शहरातील वाहतूक यंत्रणा जबाबदार कशी असेल?
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्‍त, वाहतूक विभाग.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×