पुणे – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी लोकअदालतचे आयोजान करण्यात आले आहे. यामध्ये प्रलंबित आणि दाखलपूर्व मिळून 56 हजार दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे करोनाच्या परिस्थितीत व्हॉट्सअपसह अन्य ऑनलाईन माध्यमातून आणि प्रत्यक्ष हजर राहुन पक्षकारांना बाजू मांडता येणार आहे.
यावर्षीची ही पहिलीच लोकअदालत आहे.
यापूर्वी एप्रिलमध्ये होणारी लोकअदालत पुढे ढकलण्यात आली होती. राष्ट्रीय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार या लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. ए. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार 45 पॅनेल तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी दिली.
प्रत्येक पॅनेलमध्ये न्यायाधीश, वकील, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. भूसंपादन, धनादेश बाऊन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, वीजबिल, पाणीपट्टी, मालक आणि नोकर वाद, महसुल, तडजोड योग्य दिवाणी आणि फौदजारी दाव्यांचा समावेश आहे.