पुणे – करोनाच्या नव्या बाधितांपेक्षा शनिवारीही जवळपास दुप्पट व्यक्ती करोनामुक्त झाल्या. गेल्या 24 तासांत शहरात 1 हजार 693 नवीन बाधित सापडले, तर 3 हजार 33 जण करोनामुक्त झाले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून नव्या बाधितांची संख्या दररोज कमी होताना दिसत आहे. सततच्या घटत्या नव्या बाधित संख्येमुळे शहरातील सक्रिय बाधित संख्या 22 हजार 304 पर्यंत खाली आहे. दरम्यान, दिवसभरात 12 हजार 409 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 23 लाख 52 हजार 619 जणांच्या तपासणी अहवालातून 4 लाख 57 हजार 986 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यातील 4 लाख 28 हजार 43 बाधित करोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत करोनामुळे 7 हजार 659 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 72 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहर हद्दीतील 48 जणांचा समावेश आहे.
साडेचार हजार रेमडेसिविरचा पुरवठा
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दररोज कोविड रुग्णालयाकडून येणाऱ्या मागणीच्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनची वाटप केले जात आहे. दरम्यान, शनिवारीही दिवसभरात 592 कोविड रुग्णालयांना 4 हजार 539 इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून दररोज साडेचार ते सहा हजाराच्या आसपास इंजेक्शनचा पुरवठा होत आहे.