पुणे : ‘हॉटस्पॉट’ गावांची संख्या 200 ने घटली

ग्रामीण भागात करोनाची स्थिती काहीशी नियंत्रणात


नव्या बाधितांची संख्या घटल्याने यंत्रणेला दिलासा

पुणे – मागील महिनाभरात ग्रामीण भागातील करोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे “हॉटस्पॉट’ असलेल्या गावांची संख्याही झपाट्याने कमी झाल्याचे समोर आले आहे. सध्या जवळपास 50च्या आत गावे “हॉटस्पॉट’ आहेत. महिनाभरात तब्बल दोनशेने ही संख्या कमी झाल्याचे दिसून आले.

मार्चमध्ये करोना विषाणूने पुणे शहरात शिरकाव केला. हवेली तालुक्‍याचा बहुतांश भाग शहरात येतो. त्यामुळे सुरुवातीला बोटावर मोजता येतील एवढे बाधित या भागात सापडले. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ताकाळ उपाययोजना करून शहरातून ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्यांवर निर्बंध आणले.

पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे दोन महिने हा प्रादुर्भाव शहरातच थोपवण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, जूननंतर ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढू लागला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये करोना संसर्गाने तर कहर माजवला. त्यावेळी “हॉटस्पॉट’ गावांची संख्या पाचशेच्या पुढे गेली.

राज्यातील करोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि संशयितांचे तात्काळ निदान व्हावे, यासाठी शासनाने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अनेक बाधितांचे निदान झाले. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत झाली. दि.16 ऑक्‍टोबर रोजी ग्रामीणमध्ये 465 गावे “हॉटस्पॉट’ होती. तर ऑक्‍टोबर अखेरपर्यंत ही संख्या 249 पर्यंत खाली. मागील महिनाभरात बाधितांची संख्या घटल्यामुळे हॉटस्पॉट गावांची संख्या आज तब्बल पन्नासच्या आत आली आहे.

सर्वाधिक “हॉटस्पॉट’ खेडमध्ये
जिल्ह्यातील “हॉटस्पॉट’ गावांची संख्या कमी झाली असून, दहा ते पंधरापेक्षा जास्त बाधित संख्या असलेल्या एकूण 23 ग्रामपंचायती “हॉटस्पॉट’ आहेत. त्यामध्ये आंबेगाव 1, खेड-7, दौंड-5, हवेली-3, जुन्नर-3 आणि शिरूर तालुक्‍यात 4 ग्रामपंचायती “हॉटस्पॉट’ आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.