पुणे – बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज

मेजर जनरल एच. के. अरोरा यांचे मत

पुणे – आजच्या काळात बांधकाम व्यवसायात ज्ञानवर्धित संशोधन आणि अत्याधुनिक प्रशिक्षणाची कास धरली जावी, तसेच बांधकामाची प्रक्रिया ही उत्तम दर्जा साधत वेगवान व्हावी. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अर्थात “मेकॅनाइज्ड ऍण्ड इंटेलिजन्ट कन्स्ट्रक्‍शन’ही काळाची गरज असल्याचे मत “कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग’ अर्थात “सीएमई’चे अधिष्ठाता आणि डेप्युटी कमाण्डट मेजर जनरल डॉ. एच. के. अरोरा यांनी गुरूवारी व्यक्त केले.

“पुणे कन्स्ट्रक्‍शन इंजिनिअरिंग रिसर्च फांउडेशन’ तर्फे आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विश्‍वास लोकरे, सचिव नीळकंठ जोशी तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी संजय वायचळ, जयदीप राजे आणि नरेन कोठारी उपस्थित होते.

बांधकामासाठी आवश्‍यक यंत्रसामग्री, साहित्य, पद्धती आणि प्रकल्प या संबंधीचे सर्वांत मोठे प्रदर्शन म्हणून ओळखले जाणाऱ्या “कॉन्स्ट्रो’च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच डॉ. अरोरा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. रेसिडेन्सी क्‍लब येथे हा समारंभ नुकताच पार पडला. यंदाचे कॉन्स्ट्रो प्रदर्शन दि. 16 ते 19 जानेवारीदरम्यान सिंचननगर येथे होणार असून, “मेकॅनाइज्ड ऍन्ड इंटेलिजन्ट कन्स्ट्रक्‍शन’ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या द्वैवार्षिक प्रदर्शनाची ही सोळावी आवृत्ती आहे.

“पीसीआरएफ’ या संस्थेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात असलेल्या तंत्रज्ञानातील ताजे आणि नवे प्रवाह या व्यवसायाशी संबंधितांना आणि सामान्य नागरिकांनाही जाणून घेता येतात, असे अरोरा यांनी यावेळी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.