पुणे : महापालिकेची परवानगी न घेता शहरात अनधिकृतपणे बोर्ड, फ्ल्केस, बॅनर लावणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून मागील तीन महिन्यात ११० जणांच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी शहरातील वेगवेगळया पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, पोलिसांकडूनही गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
आकाशचिन्ह विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेकडून अनधिकृत जाहीरातदारांवर कारवाई करण्यासाठी महापालिका सहाय्यक आयुक्तांची अंमलबजावणी तसेच जबाबदार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यावर परिमंडळ उपायुक्तांचे पर्यवेक्षक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात दर्शनीय भागात तसेच सार्वजनिक मालमत्तांवर अनधिकृत जाहीरात लावल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या तीन महिन्यात अशा बेकायदा फ्लेक्स लावणाऱ्या जाहीरातदारांकडून प्रती फलक १ हजार रुपये या प्रमाणे ५ लाख २३ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई झाल्यानंतरही वारंवार जाहीराती लावल्या जात असल्याने ११० जणांच्या विरोधात पोलिसांंमध्ये तक्रार करण्यात आली असून, अशा कारवाया आणखी वाढविण्यात येणार आहेत.
त्यामुळे शहरातील नागरीक, संस्था, जाहीरातदार, व्यापारी, उद्योजक यांनी अनधिकृतपणे जाहीराती लावू नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.