पुणे – मध्यमवर्गीय भाजपला धडा शिकवतील – मोहन जोशी

पुणे – बॅंकिंग सेवांचे वाढलेले दर, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दराचा बोजा आणि जीएसटीमुळे सोसावा लागणारा अतिरिक्त करांचा भार अशा समस्यांमुळे शहरी मध्यमवर्गीय चांगलाच वैतागला असून हा वर्ग यावेळी भाजपला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत आहे, असे प्रतिपादन आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी कोथरूड विधानसभा मतदार संघात आयोजित रॅलीत केले.

मध्यमवर्गीयांना परवडतील अशा दरात छोटे फ्लॅट निर्माण करण्यासाठी जे धोरणे भाजपने आखली नाहीत. तसेच मध्यमवर्गीय घरातील करती मुले शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. शिक्षण आणि आरोग्य याचा खर्च हाताबाहेर गेला आहे. मिळणाऱ्या महिन्याच्या पगारात प्रपंच चालवणे हाताबाहेर गेल्याने हा वर्ग हतबल झाला असून भाजप सरकारवर तो कमालीचा वैतागला आहे. हा वर्गच भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मोठी भूमिका बजावेल, असे चित्र आहे. पुण्यात हे चित्र सर्वत्र जाणवत आहे, असेही जोशी यांनी नमूद केले. या रॅलीमध्ये चंदू कदम, वैशाली मराठे, लक्ष्मी दुधाणे आदी सहभागी झाले होते.

बापटांना आपटा : कोपरा सभेत घणाघात
योग्य नियोजनाअभावी पुण्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कसबा पेठेतील जुन्या वाड्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. शासनाने त्याबाबत चुकीचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी काहीच केले नाही, ते फक्त आश्‍वासन देतात. कसबा पेठेत मेट्रोचे स्टेशन केले जाणार आहे. तेथील 250-300 लोकांचे काय? असा सवाल करत मोहन जोशी यांनाच विजयी करत “बापटांना आपटा’ असे आवाहन नगरसेवक रवी धंगेकर यांनी शनिवारी प्रचारफेरी दरम्यान केले. कसबा पेठेतील पवळे चौकात कोपरा सभेचे आयोजन केले होते. यामध्ये कमल व्यवहारे, नीता परदेशी, विद्या भोकरे, बुवासाहेब नलावडे, गणेश नलावडे आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांची अप्रत्यक्ष भाजपला मदत
मोदी पुन्हा सत्तेवर आले, तर देशात संविधान आणि लोकशाही टिकणार नाही. या निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी अक्षरश: पायघड्या घातल्या होत्या. मात्र त्यांनी अवास्तव मागण्या करून महाआघाडीत येणे टाळले. राज्यात प्रत्येक मतदार संघात उमेदवार देऊन ते मतांचे विभाजन करून अप्रत्यक्ष भाजपला मदत करीत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केला. गोखलेनगर येथील प्रचार सभेदरम्यान चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांवर शरसंधान केले. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, आमदार अनंत गाडगीळ, बाळासाहेब शिवरकर, डॉ. नितीन राऊत, प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, अभय छाजेड, दीप्ती चवधरी, प्रा. सुषमा अंधारे, गोपाळ तिवारी, सचिन तावरे, माजी नगरसेवक रुपाली ठोंबरे-पाटील, निलेश निकम, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.