पुणे – मीटर आले 40 हजार, बसविले अवघे 40

पुणे – समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरात सुमारे 3 लाख 20 हजार पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. यासाठी 40 हजार मीटर शहरात दाखल झाले आहेत. मात्र, त्यातील केवळ 40 मीटरच महापालिकेने गेल्या काही महिन्यांत बसविल्याने आयुक्‍त सौरभ राव यांनी प्रशासनाच्या या संथ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आयुक्‍त राव यांनी शहरातील विकासकामांच्या आढाव्याची बैठक नुकतीच घेतली. महापालिकेकडून सुमारे 2,512 कोटी रुपये खर्चून समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.

हे काम तीन टप्प्यांत आणि तीन विभागांत करण्यात येत आहे. त्यात पाण्याच्या 82 टाक्‍या बांधणे, 1,600 किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकणे, तर तिसऱ्या टप्प्यात सुमारे 3 लाख 20 पाणी मीटर बसविणे अशा स्वरूपात कामे आहेत.

नवीन जलवाहिनीचे काम सुरू केल्यानंतर आता पालिकेने व्यावसायिक मिळकतींना पाणी मीटर बसविण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीला काही पाणीमीटर बसविल्यानंतर मीटर पुरविणाऱ्या कंपनीने चुकीच्या पद्धतीने मीटर बसविल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर प्रशासनाने नव्याने हे काम सुरू केले असून गेल्या काही महिन्यांत अवघे 40 मीटर बसविण्यात आल्याची माहिती आयुक्तांच्या बैठकीत देण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. आधी टाक्‍यांच्या कामात प्रगती नव्हती, त्यानंतर जलवाहिनीच्या तर आता 40 हजार मीटर आलेले असताना अवघे 40 मीटर बसविल्याने “हे काम वेगाने न झाल्यास योजना मुदतीत पूर्ण होणार नाही. तसेच पाण्यासाठीचे नियोजनही होणार नाही,’ अशा शब्दांत आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हे काम वेगाने करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागास दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.