पुणे – हवामान बदलामुळे राज्यातील कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी हिवाळ्यात राज्यात उकाडा वाढला असून, शनिवारी (दि. ७) राज्यात पुण्यातील कोरेगाव पार्क येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर नाशिक येथे सर्वांत कमी १६.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
राज्यात आठवडाभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू असून, मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला. गेल्या २४ तासात हवामानात बदल होत असून, शनिवारी (दि. ७) काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. तर पुढील दोन दिवसात हवामान कोरडे राहील आणि कमाल व किमान तापमानात घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे.
काही प्रमाणात धुके
गेल्या २४ तासात पुणे शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे १८ अंशांवरील किमान तापमान ६ अंशांपर्यंत खाली आले. सकाळी काही प्रमाणात धुके पडत असून, शनिवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता.