पुणे – टंचाई आराखड्यावर लवकरच बैठक

मुख्य सचिवांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

पुणे – जिल्ह्यातील सात तालुके आणि 19 मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत या ठिकाणी 70 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले असून, येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आराखडा बैठक बोलावली जाणार आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्‍यांमध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सात तालुके होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी पाच तालुक्‍यांमधील 19 मंडलांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात पुणे शहर वगळता 13 तालुके आहेत. त्यातील मावळ तालुका वगळता अन्य 12 तालुक्‍यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. त्याचा आढावा घेण्यात आला.

दुष्काळ निवारणासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विविध प्रकारची 2 हजार 718 कामे सुचवण्यात आली आहेत. त्यामध्ये नवीन विंधन विहिरी तयार करणे, जुन्या विंधन विहिरींची दुरूस्ती, नळ जोडणी योजना, तात्पुरत्या पूरक योजना, पाणीसाठ्यांमधील गाळ काढणे, टॅंकरने पाणीपुरवठा करणे आदी कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या भागात अत्यावश्‍यक सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 70 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. आगामी काळात जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संवाद साधून दुष्काळाचा आढावा घेतला.

जिल्ह्यात 15 मेपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. त्यानंतर चारा छावण्यांची गरज भासणार आहे. शिरुर आणि बारामती या तालुक्‍यांमध्ये चारा छावण्यांची गरज निर्माण होणार आहे. याबाबतचे प्रस्ताव अद्याप आलेले नाहीत. प्रस्ताव आल्यानंतर चारा छावण्यांना मंजुरी दिली जाईल.
– डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.