पुणे : नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली गावातील ग्रामस्थांनी गुजरातमधून बिबट्याची अवैध घुसखोरी केल्याच्या आरोपावर महाराष्ट्र वनविभागाने तपास सुरू केला. नर्मदा नदीत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला घेऊन जात असलेली बोट गावकऱ्यांनी थांबवली. त्यात गुजरातच्या वनविभागाचे अधिकारी होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मणिबेली या आदिवासी गावातील रहिवाशांसह काही मच्छिमारांनी नदीकाठावर एक बोट थांबवली तेव्हा ही घटना उघडकीस आली. बोटीमध्ये पिंजऱ्यात बिबट्या होता आणि स्थानिकांच्या दाव्यानुसार, गुजरात वन विभागाचे किमान ७-८ अधिकारी बोटीवर उपस्थित होते. या घटनेचे कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग झाले असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर कारवाई करत महाराष्ट्र वनविभागाने परिक्षेत्र वन अधिकारी आणि मानद वन्यजीव रक्षक यांच्यामार्फत गावकऱ्यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.
आम्ही बिबट्याच्या कथित वाहतुकीची चौकशी सुरू केली आहे. आम्ही गुजरातच्या वनविभागाशीही संवाद साधला, त्यांना याबद्दल विचारले त्यांनी हे मान्य केले आहे. बिबट्या खरोखर गुजरातचा होता, त्याला फक्त गुजरातमधील रेस्क्यू सेंटरमध्ये सोडण्यात येणार होते, मात्र बचाव सदस्य रात्रीपर्यंत थांबण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेवर गेला जेणेकरून त्यांना सोडता येईल, असे उत्तर गुजरातच्या वनविभागाकडून आले. मात्र त्यांचे हे स्पष्टीकरण समाधानकारक नाही, असे नंदुरबार वनविभागाचे उप वनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. त्यामुळे याचा सविस्तर अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे सादर केला जाईल, असे पाटील यांनी नमूद केले.
एक फेब्रुवारी रोजी सापुतारा गावात आंतरराज्य वनविभागाची बैठक होणार असून, त्यात धुळे, नाशिक आणि नंदुरबार वनविभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीला गुजरातच्या वनविभागाचे सदस्यही उपस्थित राहणार असून, यामध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध प्राण्यांच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या घटनेत महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या बोटीच्या वापरावर विविध दावे करण्यात आले आहेत. या घटनेत वापरण्यात आलेली बोट महाराष्ट्र सरकारची असून ती नंदुरबार पुनर्वसन कार्यक्रमाच्या सरदार सरोवर प्रकल्पासाठी वापरली जात आहे. या बोटीची मागणी गुजरात वनविभागाकडून गस्तीसाठी करण्यात आली होती, मात्र त्यांनी ती बिबट्याच्या वाहतुकीसाठी वापरल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक सागर निखुंभे यांनी सांगितले.
अशी बेकायदेशीर जनावरांची वाहतूक होत असलेली ही एकमेव घटना नसून असे प्रकार येथे वारंवार घडत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. तथापि, महाराष्ट्रातील वन अधिकारी या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे अवैध प्राण्यांच्या वाहतुकीला मोकळीक मिळते आणि शेवटी जिल्ह्यातील मानव-बिबट्या संघर्ष वाढण्यास हातभार लागतो. अधिकृत माहितीनुसार, जिल्ह्यात मे २०२४ पासून बिबट्याच्या हल्ल्यामुळे ८ मानवी मृत्यूची नोंद झाली आहे आणि विविध ठिकाणी पाळीव प्राणी मारण्याच्या घटना नियमितपणे होत आहेत. महाराष्ट्र वनविभाग आता गुजरातच्या सीमावर्ती भागात सतर्कता वाढविण्याचा विचार करत असून नदीकाठच्या भागात रात्रीची गस्त वाढवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.