पुणे – चित्रप्रदर्शनातून उलगडणार एसटीचा प्रवास

पुणे – “वारी लालपरीची’ हे एसटी प्रवास सांगणारे अनोखे फिरते चित्रप्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. गेल्या पाच वर्षांतील एसटीचा प्रवास यातून उलगडणार आहे. या प्रदर्शनाची मांडणी “बस फॉर अस’ या संस्थेच्या वतीने बसमध्ये करण्यात आले आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) गेल्या पाच वर्षांतील प्रवास “वारी लालपरीची’ या प्रदर्शनातून मांडण्यात येणार आहे. एसटीच्या बदलांचा, विकासाचा प्रवास चित्ररुपात घेऊन एक एसटी बस राज्यातील निवडक बस स्थानकांवर फिरणार आहे. पहिल्या टप्प्यात हे प्रदर्शन राज्यातील कराड, सातारा, स्वारगेट, शिवाजीनगर, बारामती आणि इंदापूर बसस्थानकांमध्ये नागरिकांना पाहता येणार आहे.

पाच वर्षांपूर्वीची एसटी, त्यात झालेले बदल, एसटीने सुरू केलेले नवीन उपक्रम, नवीन गाड्या आदी प्रवास चित्ररुपाने उभा केला जाणार आहे. प्रवाशांना एसटीच्या सेवेचे अंतरंग उलघडून दाखवावेत, या हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. दि. 3 रोजी स्वारगेट आणि दि. 4 रोजी शिवाजीनगर येथील बसस्थानकांत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात, तर दि. 5 रोजी बारामती, दि. 6 रोजी इंदापूर येथील बसस्थानकांत नागरिकांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. तर संबंधित विभागाने ज्या बसस्थानकांवर प्रदर्शन भरणार आहे, तेथे प्रदर्शनाचा चित्ररथ उभारण्यासाठी दर्शनी भागात जागा निश्‍चित करावी.

बससाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. स्थानकांत रांगोळी काढावी. चित्ररथाचे औपचारिक उद्‌घाटन करावे, अशा सूचना एसटी महामंडळाने विभागाला दिल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.