पुणे – कनिष्ठ महाविद्यालयीन 68 शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्‍न सुटला

पुणे – राज्यातील खासगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील वैयक्तिक मान्यता मिळालेल्या 68 शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून 3 कोटी 12 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

सन 2003-04 ते 2010-11 या वर्षांमधील 935 शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता देण्यात आली. यात 658 पूर्णवेळ व 277 अर्धवेळ शिक्षकांचा समावेश आहे. यातील 507 शिक्षकांचे वेतन पूर्वीच सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर उर्वरित शिक्षकांचे वेतन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. 68 शिक्षकांना वेतन सुरू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून अनेकदा तीव्र आंदोलने करण्यात आली होती. विविध मागण्यांसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेटही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. त्याची दखल घेत शासनाकडून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणीचा प्रस्ताव सादर करुन तो मंजूरही करण्यात आला.

आता 51 पूर्णवेळ व 17 अर्धवेळ शिक्षकांच्या वेतनासाठीचा निधी वितरीत करण्यास मान्यता दिल्याचे आदेश उपसचिव चारुशीला चौधरी यांनी काढले आहेत. एप्रिल 2017 पासून यांना वेतन मिळणार आहे. मात्र यापूर्वीच्या वेतनाच्या थकबाकीची कोणतीही रक्कम अदा करण्यात येणार नाही. रखडलेल्या वेतनाचा प्रश्‍न सुटल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.