पुणे : पाहणी पथक टाकीवर पोहोचलेच नाही

अधिकारी विधानपरिषद निवडणूक मतदान तसेच मतमोजणीच्या कामावर

बिबवेवाडी – पर्वती येथील पाण्याच्या टाक्‍यांच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त “प्रभात’ने दिल्यानंतर शहरातील सुमारे 20 टाक्‍यांचे तातडीने स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याबाबतचे पत्र महापालिका पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयास (सीओईपी) दिल्यानंतर बुधवारी (दि.2) या टाक्‍यांची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाकडून केली जाणार होती. परंतु, विधानपरिषद निवडणुकांच्या तसेच मतमोजणीच्या कामाचे कारण पुढे करीत हे काम संबंधीत अधिकाऱ्यांनी लांबणीवर टाकल्याने नागरिकांच्या जीवापेक्षा प्रशासनाला निवडणुकीचे काम महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे, प्रशासनाच्या या भूमिकेबाबत नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जीर्ण टाक्‍यांचे काम महापालिकेने तातडीने सुरू करण्याबाबत खासदार वंदना चव्हाण तसेच आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. यानुसार दुरवस्था झालेल्या टाक्‍यांची पाहणी करण्याकरिता पालिका अधिकाऱ्यांचे एक पथक बुधवारी (दि.2) पर्वती येथे जाणार होते. परंतु, विधानपरिषद निवडणूक तसेच मतमोजणीच्या कामाचे कारण देत संबंधीत अधिकारी या टाक्‍यांकडे येण्याऐवजी निवडणूकस्थळी रवाना झाले. यामुळे महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्‍नाला पुन्हा बगल दिली गेली.

या पाण्याच्या टाक्‍या जर्णी झालेल्या असताना याचे यापूर्वीच सर्वेक्षण झाले आहे त्यामुळे पुन्हा स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची गरज नसून या टाक्‍यांची दुरूस्ती अथवा नव्या बांधण्याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे, यासाठी आपण गेली एक वर्षे पालिकेकडे पाठपुरावा करीत असल्याचे आमदार मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, पालिका प्रशासन या कामी वेळखाऊपणाची भूमिका घेत आहे.

याबाबत पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता, दोन, तीन दिवसांत या टाक्‍यांची पाहणी करून त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. हे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

पालिकेच्या अधिकाऱ्यांना टाकीवर येण्यास वेळ मिळत नसेल, त्यांच्याकडून पाहणी अहवाल सादर होणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने पाहणी करून याबाबतचा अहवाल अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवेल.
– जयराज लांडगे, पुणे शहर उपाध्यक्ष, मनसे 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.