पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना खंडणीविरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. एनडीए रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
अनिकेत विनायक जाधव (वय २४, रा. गारमाळ, धायरी), गणेश तानाजी किवळे (वय २३, रा. नांदोशी, सिंहगड रस्ता) अशी त्यांची नावे आहेत.
कोंढवे धावडे परिसरात एक जण थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकातील प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जाधव आणि किवळे यांना पकडले. दोघांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि तीन काडतुसे जप्त केली.
खंडणीविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, प्रफुल्ल चव्हाण, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, मयूर भोकरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, रवींद्र फुलपगारे, प्रवीण ढमाळ, अमर पवार यांनी ही कारवाई केली.