पुणे – थकीत दंड वसुलीसाठी थेट गाठणार घर

संग्रहित छायाचित्र........

वाहतूक पोलिसांकडून मोहिम : दंड थकविणे पडणार महागात

पुणे – वाहतूक पोलिसांनी सुमारे 13 लाख बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला खरा; परंतु हे बेशिस्त पोलिसांवरच शिरजोर झाले आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक चालकांनी दंडच भरला नसल्याचे समोर आले आहे. आता यांना जागेवर दंडुका दाखवणे शक्‍य नसल्याने या बेशिस्तांचे थेट घरच गाठण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. पूर्वी हाताने होणाऱ्या पावत्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला. तंत्रज्ञानाने “अपडेट’ होत पोलिसांनी “सीसीटीव्ही’च्या माध्यमातून “बेशिस्तांवर’ वॉच ठेवला आणि “ई-चलन’द्वारे त्यांच्यावर कारवाई देखील केली. मात्र, “अपडेट’ कारवाईचा बडगा उगारून सुद्धा अनेक वाहनचालकांनी हा दंड बुडविला आहे. पण आता वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड थकविणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. वाहनचालकांनी थकवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या दंडाची वसुली वाहतूक पोलिसांनी आता लवकरच थेट घरी जाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या “बेशिस्त’ पुणेकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नियमभंग आणि दंडाची रक्कम थकवून वाहतूक पोलिसांवर शिरजोरी करणे बेशिस्त वाहनचालकांना महाग पडणार आहे. वाहतूक पोलिसांनी नेहमीच “या’ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, याला न जुमानणाऱ्या बेशिस्तांकडून दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जानेवारी 2019 पासून दंड वसुलीची विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेत काही प्रमाणात दंडाची रक्कम वसूल झाली असली तरी अद्यापही काही कोटी रुपयांचा दंड वसूल होणे बाकी आहे.

सन 2017 मध्ये वाहतूक पोलिसांनी 12 लाख 91 हजार 87 वाहनचालकांवर 32 कोटी 24 लाख 87 हजार 428 रुपयांची दंडाची कारवाई केली. त्यातील केवळ निम्म्या म्हणजेच 6 लाख 15 हजार 823 वाहनचालकांकडून 13 कोटी 81 लाख 68 हजार 445 रुपयांचा दंड वसूल झाला आहे. याचे प्रमाणे सन 2018 मध्ये देखील “जैसे थे’ असल्याने दिसून येते. 2018 मध्ये 14 लाख 73 हजार 33 वाहनचालकांवर 46 कोटी 45 लाख 28 हजार 297 रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली. तेव्हा देखील फक्त 8 लाख 12 हजार 131 वाहनचालकांकडून 14 कोटी 56 लाख 70 हजार 45 रुपयांची दंडवसुली करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे.

वाहतूक पोलिसांच्या दंडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक विभागाला सन 2017 मधील 18 कोटी 43 लाख 18 हजार 983 रुपयांचा दंड येणे बाकी आहे. तर सन 2018 मधील 31 कोटी 88 लाख 58 हजार 252 रुपयांचा दंड बेशिस्त वाहनचालकांनी थकवला आहे.

वाहतूक नियमभंग करणाऱ्या नागरिकांकडून दंड वाहतूक पोलीसांकडून वसूल करणार आहे, यात कोणतीही शंका नाही. यासाठी वाहतूक पोलीसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दंड थकवणाऱ्याला आणि यंत्रणेकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना पोलीसांकडून कोणत्याही प्रकारची सुट दिली जाणार नाही.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)