पुणे – ‘शहिदांच्या कुटुंबीयांचे पालकत्त्व’ उपक्रम आता विभागातही

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर : जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे कौतुक

पुणे – शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने राबविलेला स्तुत्य उपक्रम, पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याबाबत आयोजित मेळाव्यात घेऊन कुटुंबांचे पालकत्व घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

महिला दिनाचे औचित्य साधत पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. 8) शहीद जवानांच्या कुटुंबांच्या मेळाव्याचे आयोजन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार (निवृत्त) जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांसह शहीद जवानांच्या कुटुंबांतील सदस्य उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील 115 शहीद कुटुंबीयांना दत्तक घेण्यात आले.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, “देशात दोन माणसं समर्पन देतात ते म्हणजे “शेतकरी’ आणि “सैनिक’. पण दोघांचीही स्थिती चांगली नसून, स्वत:च्या हक्कासाठी त्यांना लढावे लागत आहे. सध्या शहिदांच्या कुटूंबियांसाठी योजना अनेक आहेत. परंतू, त्याबाबत योग्य मार्गदर्शन होत नसल्यामुळे योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाकडून मिळणारी मदत शहिदांच्या कुटुंबांना लवकर मिळवून देण्यासाठी सर्व अधिकारी एकत्र येऊन प्रयत्न करणार आहेत. तसेच जमिनीच्या समस्या, मुलांची शाळा, महाविद्यालयासह आरोग्य आणि अन्य कागदपत्रांबाबत येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यात येणार आहे. सूरज मांढरे म्हणाले, शहिद कुटुंबीयांच्या मदतीसाठी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी त्यांचे पालकत्व स्वीकारणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 115 कुटुंबीयांना मदत केली जाणार असून, प्रत्येक अधिकाऱ्यांना त्याबाबतची जबाबदारी विभागून दिली आहे. धोरणात्मक बदलासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here