पुणे – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात उच्चभ्रू सोसायटी आणि झोपडपट्टी अशा दोन्ही भागांचा जवळपास समान वाटा आहे. उच्चभ्रू सोसायट्या या नेहमी भाजपला साथ देत आल्या आहेत. तर, झोपडपट्टी आणि वस्तीतील भाग नेहमी विरोधकांना साथ देत आला आहे. यावेळी मात्र वेगळे चित्र पहायला मिळाले.
या दोन्ही क्षेत्रांतील लोकांनी भाजपाला साथ दिली आहे. त्यामुळे या मतदार संघातील भाजपचे मताधिक्य वाढले आहे. आमदार सिध्दार्थ शिरोळे तब्बल ३६ हजार ७०२ मताधिक्य मिळाले आहे. विशेषत: लाकडी बहीण योजना आणि हिंदूत्त्ववादी प्रचाराचा फायदा येथे भाजपला झाला.
हा मतदार संघ तसा नेहमी शिवसेना-भाजपला साथ देत आला आहे. मात्र, २०१९ मध्ये येथील मताधिक्य घटले होते. केवळ ५ हजार १२४ मतांनी शिरोळे विजयी झाले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने १० हजारांहून अधिक मते मिळविली होती. त्यानंतर यावर्षी लोकसभा निवडणूक झाली. यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले. मात्र, या मतदार संघातील मताधिक्य घटले होते. त्यांना केवळ तीन हजार मतांची आघाडी मिळाली होती. शिरोळे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात होती.
मात्र, त्यानंतर शिरोळे सक्रीय झाले. त्याबरोबरच लाडकी बहीण ही योजना लोकप्रिय ठरली. त्यातच मागील विधानसभेच्या मतदानापेक्षा सुमारे ७ टक्के मतदान वाढले होते. याचाही फायदा भाजपला मिळाल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसमध्ये बंडखोरी झाली. बंडखोर उमेदवाराने १३ हजारांहून अधिक मते मिळविली. मात्र, त्याचा विजयावर फारसा परिणाम झाला नाही. ही मते कॉंग्रेसला मिळाली असती, तरीही शिरोळे हेच विजयी झाले असते, असे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
खडकी, बोपोडीतही मताधिक्य
खडकी, बोपोडी भाग हा नेहमी भाजप विरोधी राहिला आहे. मात्र, यावेळी तेथूनही शिरोळे यांना मताधिक्य मिळाले आहे. २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. त्यामध्ये केवळ १५ व्या या एका फेरीतच कॉंग्रेसला मताधिक्य मिळाले आहे. उर्वरित सर्व फेऱ्यांत भाजपला आघाडी मिळाली आहे. गोखलेनगर येथील जनवाडी भागातून कॉंग्रेसला मताधिक्य मिळाल्याचे समजते.
मतदार संघामध्ये शिवाजीनगर गावठाण, मॉडेल कॉलनी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, औंध, बाणेर, खडकी, खडकी बाजार, बोपोडी, दापोडी, पाटील इस्टेट, वाकडेवाडी, पोलीस लाइन, रेंजहिल, गोखलेनगर, वडारवाडी या परिसराचा समावेश आहे.