डॉ. राजू गुरव
पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाचा एकच आमदार सलग दोनदा निवडून येत नाही. हा इतिहास यंदाही कायम राहिला. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार पक्षाचे आमदार सुनील टिंगरे विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्यात चुरशीची लढत झाली. यात अखेर पठारे यांनी बाजी मारली आहे. या मतदार संघात तब्बल ४ हजार २५९ मतदारांनी “नोटा’चा पर्याय अवलंबला आहे.
वडगावशेरी या विधानसभा मतदार संघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर येथून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षाचे आमदार झाले. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बापूसाहेब पठारे यांनी ३३ हजार ११६ मतांनी शिवसेनेच्या अजय भोसले यांचा पराभव केला होता.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या जगदीश मुळीक यांनी तत्कालीन शिवसेनेचे सुनील टिंगरे यांचा ५ हजार ३२५ मतांनी पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा ४ हजार ९५६ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या सुनील टिंगरे यांना ४ हजार ७१० मताधिक्याने पराभव केला आहे.
मतमोजणीच्या पहिल्या २० फेऱ्यांमध्ये टिंगरे हे सतत आघाडीवर होते. पाचव्या फेरीअखेर सुनील टिंगरे यांना ३६ हजार ७००, तर बापूसाहेब पठारे यांना २६ हजार ४९४ मते मिळाली. दहाव्या फेरी अखेर टिंगरे यांना ६७ हजार २९२, तर पठारे यांना ५० हजार ९९४ मते मिळाली. पंधराव्या फेरीअखेर टिंगरे यांना ९१ हजार ९०९ तर पठारे यांना ८० हजार ४३६ मते मिळाली.
या फेरीपासून टिंगरे यांचे मताधिक्य कमी कमी होत गेले. विसाव्या फेरी अखेर टिंगरे यांना १ लाख १५ हजार ४०० तर पठारे यांना १ लाख १४ हजार ६१४ मते मिळाली. यात टिंगरे यांनी केवळ ७८६ मतधिक्य मिळाले. यात लोहगाव, विमाननगर, धानोरी, विश्रांतवाडी या भागातील मतदानांचा टिंगरे यांना फायदा झाला.
एकविसाव्या फेरीपासून टिंगरे पिछाडीवर पडले व पठारे यांनी आघाडी घेतली व ती विजयापर्यंत कायम ठेवली. या एकविसाव्या फेरीत पठारे यांना १ लाख २३ हजार ७१६ तर टिंगरे यांना १ लाख २० हजार मते मिळाली. यात पठारे यांनी ३ हजार ४३१ मताधिक्य आहे. वाविसाव्या फेरीत पठारे यांना १ लाख ३० हजार ४८८ तर टिंगरे यांना १ लाख २६ हजार ५०९ मते मिळाली आहेत.
यात पठारे यांना ३ हजार ९७९ मताधिक्य मिळाले. शेवटच्या तेविसाव्या फेरीअखेर पठारे यांना १ लाख ३३ हजार १७७ तर टिंगरे यांना १ लाख २८ हजार ६०८ मते मिळाली. यात पठारे यांना ४ हजार ५६९ मताधिक्य मिळाले आहे.
महायुतीच्या काही कार्यकर्त्यांची पठारे यांना मदत
वडगावशेरी, खराडी, येरवडा, मांजरी या भागातील मतदानामुळे पठारे यांना तारले. भाजप, मनसे, आरपीआयच्या काही कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पठारे यांचे काम केले. अजित पवार पक्षातील नाराज असलेल्या काही मंडळींनीही पठारे यांचे काम केले. यामुळेच पठारे यांना मोठा फायदा झाल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा पसरलेली आहे. पोस्टल बॅलेटमध्ये १ हजार १६ मतदारांनी मते नोंदविली होती. यात पठारे यांना ५१२ तर टिंगरे यांना ३७१ मते मिळाली आहेत.