पुणे विद्यापीठाचा ऑनलाइन पदवीप्रदान समारंभ
पुणे – करोना प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाची परीक्षा होणार की नाही, याबाबत विद्यार्थी सांशक होते. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग, विद्यापीठातील कुलगुरू, प्राध्यापकांनी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, ही बाब योग्यच आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ ऑनलाइन पद्धतीने गुरुवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू करमळकर यांनी शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.
करोनासारख्या आव्हानास सर्वांनी संधी म्हणून पाहायला हवे, असे सांगत राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय शिक्षणाची एक सर्वोत्तम संकल्पना आहे. याला प्रोत्साहन दिले गेल्यास विद्यार्थ्यांना सर्व विद्याशाखांमधील ज्ञान मिळू शकते. शिवाय, त्याला ज्या विषयात स्पेशलायझेशन करायचे आहे त्यात तो करू शकतो, असे सांगत त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले. उद्योजक डॉ. नौशाद फोर्ब्स म्हणाले की, सध्याच्या आव्हानात्मक काळात सर्व तरुण पदवीधरांनी नेतृत्व स्वीकारून एक चांगला आदर्श समाजासमोर निर्माण करायला हवा, असा त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
इतरांचे ऐकून करिअर निवडू नका : डॉ. फोर्ब्स
तुम्ही करत असलेल्या कामात आनंद मिळत नसल्यास तातडीने ते थांबवा. आपल्यापैकी बरेचजण इतरांचे ऐकून अभ्यासक्रम आणि करिअरची निवड करतात. जे योग्य नाही. औद्योगिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल, तर कंपनीच्या प्रसिद्धीपेक्षा तिच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यायला हवे, असा सल्ला उद्योजक डॉ. फोर्ब्स यांनी दिला.