पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चारही अधिष्ठाता पदाच्या निवडीबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. मात्र अजून अधिष्ठाता नियुक्तीचा निर्णय होऊ शकलेला नाही. एवढेच नव्हे, कार्यरत अधिष्ठांताना अद्याप पदमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेले चारही प्राध्यापकांची नियुक्ती पुढे नियमित राहणार की नव्याने नेमणुका होणार, हा विषय अद्याप गुलदस्त्यात आहे.
पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल दि. 18 मे रोजी संपला. त्याच दिवशी राजभवन कार्यालयाने पुणे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच कुलगुरूपदाचा कार्यकाल संपल्यानंतर चारही अधिष्ठातापदाचा कार्यभार पुढे कायम राहणार का? या विषयावर काळे यांनी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार नवीन कुलगुरूस विद्यमान अधिष्ठाताची सेवा पुढे सुरू ठेवण्याचे अधिकार आहेत. विद्यापीठातील शैक्षणिक काम गतीने होण्यासाठी विद्याशाखेचा प्रमुख म्हणून अधिष्ठाता हा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे अधिष्ठाता पदाच्या निवडीबाबतचा निर्णय लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा शैक्षणिक वर्तुळातून होत आहे.
विद्यापीठ कायदा काय सांगतो…
अधिष्ठाता पदाचा कालावधी कुलगुरूंच्या पदाचा कालावधी इतकाच किंवा त्यांचे नियमित वयोमान पूर्ण होईपर्यंत असेल. परंतु नवीन अधिष्ठात्याची नियुक्ती होईपर्यंत नवीन कुलगुरूस अधिष्ठात्याची सेवा पुढे सुरू ठेवता येईल. तसेच मृत्यू, राजीनामा किंवा अन्य कारामुळे कुलगुरूचे पद रिक्त झाल्यास, अधिष्ठाता हा त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत पद धारण करता येईल.