पुणे : हिरवाई उद्यानातील सायकल ट्रॅक बंदच; पथ विभागास माहितीच नाही

  • फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

पुणे – महापालिकेच्या परवानगीनंतर शहरातील बहुतांश उद्याने सुरू झाली आहेत. मात्र, प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यानातील सायकल ट्रॅकचा रस्ता अजून खुला झालेला नाही. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असून, तो त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, हे ट्रॅक बंद असल्याची माहितीच पथ विभागास नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे, पालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा समोर आला आहे.

प्रभात रस्त्यापासून बीएमसीसी रस्त्यापर्यंत हिरवाई उद्यान शहराचे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे सायकल ट्रॅकसाठी स्वतंत्र रस्ता आहे. त्यामुळे उद्यान आणि त्यातील सायकल ट्रॅकच्या रस्त्यावरून मॉर्निंग वॉक व सायंकाळी फिरण्यासाठी परिसरातील नागरिक येतात. मात्र, सायकल ट्रॅकचा रस्ता बंद असल्याने उद्यानातील मातीच्या रस्त्यावरून जॉगिंग करावी लागते.

ऐन थंडीच्या दिवसात पाऊस झाला. त्यामुळे उद्यानातील रस्ता ओलसर असून, त्यावरून ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉक करीत आहेत. त्यावरून पाय घसरण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत सायकल ट्रॅक रस्ता नागरिकांसाठी उपयुक्‍त ठरतो. तसेच थंडी कमी होताच उन्हामुळे मातीच्या रस्त्यावरून धूळ उडून त्रास होतो. हे टाळण्यासाठी सायकल ट्रॅकचा रस्ता फिरण्यासाठी योग्य ठरेल, असे ज्येष्ठांचे म्हणणे आहे.

त्याचप्रमाणे उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 10, तर सायंकाळी 5 ते 7 अशी आहे. सायंकाळी लवकर अंधार पडत असल्याने सहा वाजताच वॉकिंग थांबवावे लागत आहे. त्यामुळे सायंकाळी 5 ऐवजी 4 वाजता उद्यान सुरू करण्याची मागणी होत आहे.

मद्यपी, प्रेमीयुगुलांचा वावर
उद्यानात प्रेमीयुगुल सायकल ट्रॅक रस्ताचा वापर करतात, आणि तेथून वेळ होऊनही ही जोडपी सायकल ट्रॅकवरून निघून जात नाहीत. त्यांना वारंवार सूचना द्यावी लागत आहे. तसेच दुपारच्या सत्रात मद्यपींचा वावर वाढला आहे. त्यामुळे सायकल ट्रॅक बंद करावा लागत आहे. करोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सायकल ट्रॅक सुरू होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती उद्यानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी दिली.

उद्यान सुरू झाले, पण सायकल ट्रॅक का बंद आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सध्या उद्यानातील मातीचा रस्ताच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी वापर होत आहे. त्यामुळे त्याच मार्गावर ज्येष्ठ नागरिकांची ये-जा होत असून, गर्दीही होत आहे. करोनाचे संकट लक्षात घेता सायकल ट्रॅक खुला करणे संयुक्‍तिक ठरणार आहे. त्यामुळे सर्वांना फिरणेही सोयीस्कर होईल.
– अनिल काळे, ज्येष्ठ नागरिक


शहरातील कोणताही सायकल ट्रॅक बंद नाही. मात्र, या ठिकाणचा ट्रॅक का बंद करण्यात आला आहे याची माहिती घ्यावी लागेल. दरम्यान, हा बंद असल्यास तातडीने उघडण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, तसेच तो बंद ठेवणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.
– व्ही. जी. कुलकर्णी, पथविभाग प्रमुख


उद्यानातील सायकल ट्रॅक बंद करण्याचे कारण माहीत नाही. बहुधा त्याबाबत प्रशासनाची भूमिका काय आहे, हे कळू शकले नाही. मात्र सायकल ट्रॅक खुला केला तर सकाळ व सायंकाळी येणाऱ्या नागरिकांना सहजपणे फिरणे शक्‍य होणार आहे.
– मुकुंद अग्निहोत्री, ज्येष्ठ नागरिक 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.