पुणे – चालू स्थितीतील सरकारी औषधे जाळली

औंध येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयातील प्रकार; दोषींवर कडक कारवाईचे प्रशासनाचे आदेश

औंध – प्राण्यांसाठीची चालू स्थितीतील औषधे तसेच सलाईनच्या बॉटल्स, इंजेक्‍शन जाळून टाकल्याचा प्रकार शुक्रवारी औंध येथील जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयात घटल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार येथील कर्मचाऱ्यांनीच केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

या परिसरातील एक गोरक्षक यांना दवाखान्याच्या परिसरात औषधे जाळण्यात येत असल्याची माहिती मिळाली. याबाबत खात्री करण्यासाठी ते गेले असता, त्यांना ही घटना स्पष्ट झाली. औषधांची पाहणी केली असता, सर्व औषधी चालू स्थितीतील होती.त्याचबरोबर सलाईनच्या बॉटल्स कापून त्यातील औषधी फेकून देऊन बॉटल्स जाळण्यात आल्या होत्या.

ही औषधे का जाळण्यात येत होती, कोण जाळत होते, तो स्टॉक कधी आला, ती वापरण्यासाठी होती का, यापैकी किती औषधे खासगी मेडिकलमधून घेण्याचा सल्ला देतात व येथील औषधे जाळले जातात. यामध्ये खासगी मेडिकल व डॉक्‍टर यांचे साटेलोटे आहे का, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास प्रशासन सुद्धा टाळाटाळ करत आहे.

नागरिकांशी चर्चा केली असता, त्यांनी येथील बेशिस्त कारभाराचा पाढाच वाचला. ते म्हणाले, “कधी केस पेपर तयार करण्यासाठी कोणीही उपलब्ध नसते, वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसतात. डॉक्‍टरांनी प्राण्यांची तपासणी केल्यावर ते बाहेरील औषध लिहून देतात. ही औषधे मोफत दिली जात नाहीत, शेजारच्या खासगी मेडिकलमधून औषधे आणण्यास सांगितले जातात. शिवाय कर्मचारीदेखील उशिरा येतात. गोडाऊनमध्ये औषधांचा साठा आहे, परंतु तो अस्वच्छ जागेत आहे. येथे धुळीचे साम्राज्य आहे.

घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दोषींवर प्रशासकीय स्तरावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात येतील. कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्यात येतील.
– डॉ.शिवकुमार मुकणे, उपायुक्त, पशूसंवर्धन.


गोसेवा करताना प्राण्यांसाठी औषधांचा तुटवडा होतो. आम्हाला ही औषधे जपून वापरावी लागतात. परंतु, येथे हिच औषधे जळताना पाहून संताप येतो. या घटनेत दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
– योगेश तुपे, गोसेवक. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.