पुणे : “राज्याची सेवा करण्यासाठी जनतेने सत्ताधाऱ्यांना निवडून दिले आहेत. मात्र, सध्याचे सरकार कुणाला कोणते खाते आणि पालकमंत्रीपद द्यायचे यातच व्यस्त आहे. राज्य सरकारमधील तीनही पक्षांमध्ये रोज होणाऱ्या भांडणांचा आता उबग आला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
मार्केट यार्ड पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत सुळे यांनी महायुतीच्या कारभाराचा समाचार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कमी खर्चात रस्ते करतात. मग महाराष्ट्र सरकारचे रस्ते का कमी खर्चात होत नाहीत? राज्यातील जनतेने महायुतीला मोठे बहुमत दिले आहे. पदावरून सतत भांडणे सुरू आहेत. हे असेच सुरू राहिले, तर जनतेची कामे कधी करणार? दोन महिने होत आले अजून सरकार कामाला लागायला तयार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी, महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने आर्थिक ताणाबाबत योग्य नियोजन करून निर्णय घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.
सरकारला पत्र लिहिणार
महायुतीच्या सरकारमधील मंत्रीच क्रीडा मंत्रालयाने 600 ते 700 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द केले आहे. त्यांनीच घेतलेल्या निर्णयावर तेच हा टेंडर चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करत आहे. सध्याच्या सरकारमध्ये विरोधाभास आहे. हा गंभीर विषय असून सरकार अस्तित्वात आल्यानंतर याप्रकारे अनेक टेंडर रद्द करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.