पुणे – कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी नैमित्तिक समिती

पुणे – महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नैमित्तिक समिती नेमली जाणार आहे. या समितीला मंगळवारी झालेल्या मुख्यसभेत मान्यता देण्यात आली. समितीकडून हा अहवाल स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ दि.1 जानेवारी 2016 पासून लागू होणार असून वाढीतील फरक 5 समान हप्त्यात दिला जाणार आहे.

राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगास मान्यता दिल्यानंतर याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्यासाठी प्रशासनाची समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या दोन बैठका झाल्या असून त्यांनी वेतनवाढीचा अहवाल तयार केलेला आहे. तो आता पदाधिकाऱ्यांच्या नैमित्तिक समितीच्या मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. ही समिती प्रशासनाच्या शिफारसींचा विचार करून त्यावर निर्णय घेणार आहे. त्यानंतर या समितीच्या सूचना तसेच बदलांचा समावेश केला जाणार आहे.

400 कोटींचा भार…
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वेतन आयोगाच्या फरकापोटी महापालिकेवर सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांचा भार येणार आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांना पाच समान हप्त्यांमध्ये दिली जाणार असल्याने प्रतिवर्ष महापालिकेस 60 कोटींचा भार येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून पालिकेच्या वेतनाच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.