पुणे – प्रियकराने नोंदणी पध्दतीने विवाह करण्यासाठी प्रेयसीला विवाह नोंदणी कार्यालयात आणले. मात्र प्रेयसी वॉशरुमला जाताच प्रियकराने तेथून पळ काढला. ही घटना मामलेदार कचेरी येथे घडली. दरम्यान, प्रियकराने प्रेयसीचे आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, शैक्षणिक कागदपत्रे आणी बॅंकेची पासबुकही स्वत: जवळ काढून घेतली होती. संबंधीत प्रियकरावर फरासखाना पोलीस ठाण्यात बलात्कार आणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुळच्या पणजी येथे रहाणाऱ्या 28 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानूसार प्रियकर तेजस सुरेश शेलार (33रा.रासाई बंगला, एरंडवणे) व त्याचे साथीदार अमित यशवंतराव पापळ (35), अभिषेक यशवंतराव पापळ(33) व एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी तरुणी पुण्यामध्ये नोकरीनिमीत्त आली होती. तेव्हा तिची एका कॉमन मित्रामार्फत तेजसबरोबर ओळख झाली. यानंतर तेजसबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर त्याने तीला लग्नाचे आमिष दाखवले.
लग्नाच्या आमिषाने त्याने सन 2019 पासून तीच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये शारीरीक संबंध ठेवले. जानेवारी 2021 मध्ये ते दोघे नाशिक येथील हॉटेलमध्ये असताना, त्याचे इतर तीघे साथीदार पोलीस असल्याचे सांगत त्यांच्या खोलीत घुसले. त्यांनी फिर्यादी तरुणीचा मोबाईल, वोटर आयडी कार्ड आदी कागदपत्रे काढून घेतली. यानंतर यानंतर फिर्यादीने लग्नाचा तगादा लावल्यावर तेजसने तीला 13 फेब्रुवारी 2021 रोजी मामलेदार कचेरी येथे नोंदणी पध्दतीने विवाह करण्यास आणले. दरम्यान फिर्यादी वॉशरुमला गेली असता, तेजसने तिला एकटेच सोडून तेथून पळ काढला.
दरम्यान, तेजसने तिच्याकडील सर्व कागदपत्रे व बॅंकेचे पासबुक काढून घेतले होते. ही कागदपत्रे त्याने देण्यास नकार दिला. यामुळे तेजसविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी एका खासगी कंपनीत काम करते तर आरोपी कायदेशीर सल्लागाराच्या हाताखाली काम करतो. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील करत आहेत.