जागेची नेमकी आवश्यकता समजणार : भूसंपादनालाही मिळणार गती
पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) लागणाऱ्या जागेच्या संयुक्त मोजणीला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. “एचसीएमटीआर’च्या संपूर्ण 36 किमीची मोजणी पूर्ण केली जाणार असून त्यानंतर सरकारी/खासगी विभागाची नेमकी किती आणि कोणत्या जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. तसेच, या मोजणीनंतर भूसंपादनाला गतीही मिळणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या 1987 च्या विकास आराखड्यात शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेला होता. आयुक्त सौरभ राव यांनी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्वतंत्र कक्षाचीही स्थापना केली आहे. सुमारे 36 किलोमीटरचा हा रस्ता पूर्णत: उन्नत (एलिव्हेटेड) स्वरुपात विकसित केला जाणार असल्याने त्याचा बहुसंख्य भाग अस्तित्वातील रस्त्यांवर आहे. तरीही, महापालिकेला काही सरकारी आणि काही खासगी जागांचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी संयुक्त मोजणी तातडीने घेण्याची मागणी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत या जागांसाठी पालिकेने नगर भूमापन विभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत संयुक्त मोजणी सुरू केली आहे. या मोजणीनंतर सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या किती जागा लागणार आहेत, त्याचे क्षेत्र काय? याची माहिती उपलब्ध होणार असून, त्यानुसार भूसंपादनाचा प्रस्ताव पालिकेतर्फे तयार केला जाणार आहे. ही संयुक्त मोजणीची प्रक्रिया पुढील 15 दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.
प्रकल्पावर 6 हजार कोटींहून अधिक खर्च अपेक्षित
या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे, टप्प्याटप्प्याने हा रस्ता विकसित करण्याचा पालिकेला प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण उन्नत स्वरुपातील रस्त्याच्या बांधकामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असल्या, तरी बोपोडी ते पौड रस्ता हा 11 किमीचा मार्ग सुरुवातीला विकसित करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. या रस्त्यावरील भूसंपादन तुलनेने कमी असल्याने त्याकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे.