पुणे –महापालिका निवडणुकांची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगास दिली. त्यामुळे निवडणुका तूर्तास तीन ते चार महिन्यांसाठी लांबणीवर पडल्या असल्या, तरी महापालिका प्रशासनाने आपली तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय निवडणूक कार्यालय सुरू करण्यासाठी इमारत शोध घेऊन तेथे सर्व अत्यावश्यक सुविधा आहेत का, याची पाहणी करण्यात यावी तसेच त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिकेच्या निवडणूक विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
न्यायालयाच्या निकालाने निवडणुका लांबणीवर गेल्या असल्या तरी, जाहीर झालेली प्रभागरचना क्षेत्रीय कार्यालय निहाय निश्चित करण्यात आली आहे. त्यातच, पालिकेत नवीन 23 गावांचा समावेश झाला असून हा भागही या कार्यालयांना जोडला आहे. त्यामुळे जुनी हद्द आणि नवीन भागाला सोयीस्कर पडेल अशा पद्धतीने निवडणूक कार्यालये उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे ही कार्यालये उभारल्यानंतर निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, प्रभाग निहाय मतदान केंद्र निश्चित करणे याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेची इमारत किंवा शाळा या ठिकाणी कार्यालय सुरू करण्यात येणार असून अशा जागा निश्चित करून त्याची पाहणी करून सर्व सुविधा आहेत की नाही याची खातरजमा करावी, आवश्यक ठिकाणी कामे करून घेण्याच्या सूचना दिल्या.