पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये जप्त केलेला सौंदर्यप्रसाधनाचा साठा पाकिस्तानमधून आयात झाल्याचे स्पष्ट झाले असून, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनीच विधानसभेत ही माहिती दिली. हा सौंदर्यप्रसाधनाचा साठा पाकिस्तानच्या लाहोर प्रांतातून आयात करण्यात आला होता. यासंबंधी आमदार भीमराव तापकीर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.
धायरीमध्ये २० लाख ७२ हजार ४८७ किमतीचा सौंदर्यप्रसाधनाचा साठा जप्त करण्यात आला होता. तो साठा कर्नाटक, तेलंगणातून महाराष्ट्रात आला होता. मात्र हा साठा महाराष्ट्रात आणि तेही पुण्यात कसा आला, तो आणण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
याशिवाय अॉगस्ट २०२४ मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये असाच आयात केलेला सौंदर्यप्रसाधनांचा साठाही जप्त केला होता. हा साठा कोणत्या देशातून आला, तो अन्य कोणत्या नावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही. सध्या राज्यभरामध्ये सौंदर्यप्रसाधन लॅबची संख्या किती आहे, पुणे जिल्ह्यात सौंदर्य प्रसाधन उत्पादक आणि क्लिनिकची संख्या किती आहे आणि गैरमार्गाने काम करणाऱ्या किती जणांवर कोणती कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाने केली, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले.
मात्र सौंदर्यप्रसाधनांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्रात लॅब आहेत का, असे किती उत्पादक आहेत, आजपर्यंत किती कारवाई झाली, याविषयी झिरवळ यांना उत्तर देता आले नाही. मात्र अशा विक्रेत्यांवर अधिवेशन संपायच्या आत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन झिरवळ यांनी सभागृहात दिले.
मंत्री नरहरी झिरवळ यांनी सभागृहात दिलेले उत्तर
पिंपरी – चिंचवडमध्ये पकडलेल्या साठ्याचा विषय अतिशय गंभीर आहे. हा साठा पाकिस्तानातील लाहोर मधून आला होता. होरीक केमेस्ट्री या कंपनीने तो तयार केला आहे. विशेष म्हणजे विक्रेत्यांकडे आयात – निर्यातीचे परवाने नाहीत. त्यामुळे तो साठा आला कसा याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येईल. दुसरीकडे धायरी येथे पकडलेल्या साठ्याबाबत विक्रेत्यांकडे सौंदर्य प्रसाधाने विक्रीची परवानगी आहे. मात्र कर्नाटक आणि तेलंगणा येथील सौंदर्यप्रसाधानाबाबत परवानगी नव्हती, त्यामुळे तोही साठा जप्त करण्यात आला.