पुणे – इयत्ता बारावी आणि सीईटीत सर्वाधिक गुण मिळाले आहेत, पण अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमसाठी लाखांहून अधिक असलेले शुल्क भरणे अशक्य आहे. अशा हुशार, गरजू विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने ‘ट्यूशन फी वेव्हर’ (टीएफडब्ल्यू) ही योजना आणली आहे. त्या माध्यमातून प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण शुल्क माफ होते. या योजनेतून विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसह व्यावसायिक शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. सीईटी सेलने नुकतेच सर्व अभ्यासक्रमांचे प्रत्यक्ष प्रवेश कधी सुरु होणार आहेत, त्याचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार प्रवेशाची फेरीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी व पालकांमध्ये प्रवेशाचे वेध लागले आहे. सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात साधारणत: ५० हजार रुपयांपर्यत शिक्षण शुल्क असते.
मात्र, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण शुल्क लाखांहून अधिक असते. ज्यांची आर्थिक स्थिती साधारण आहे. पण, गुण चांगले आहेत त्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण घेता यावे, यासाठी “एआयसीटीई’ने “ट्यूशन फी वेव्हर’ (टीएफडब्ल्यू) ही योजना यापूर्वीच लागू केली आहे. फक्त अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचा विचार करता महाराष्ट्रात या योजनेंतर्गत साधारणत: सात हजार जागा उपलब्ध असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आली.
प्रत्यक्ष कॅप राऊंड अर्थात प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी अर्ज करतात, त्या वेळी “टीएफडब्ल्यू’ या योजनेचा पर्याय निवडावा लागेल. या योजनेंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात ५ टक्के जागा राखीव असतात. जागा कमी असल्यामुळे गुणवत्तेची कस लागतो. त्यामुळे ज्यांना चांगले गुण आहेत, त्यांना प्रवेश मिळतो. या योजनेतून प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षण शुल्क माफ केले जाते. केवळ विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे नाममात्र शुल्क भरावे लागेल. या योजनेची सविस्तर माहिती घेऊन त्याचा लाभ घेणे विद्यार्थ्यांना योग्य ठरेल.
कोणत्या अभ्यासक्रमासाठी टीएफडब्ल्यू ?
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत असलेल्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये ही योजना आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एमबीए, एमसीए, आर्किटेक्चर, हाॅटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नालाॅजी, एम.टेक., थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी या सर्व शाखांमध्ये या योजनेअंतर्गत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील.
‘टीएफडब्ल्यू’ योजनेची वैशिष्ट्ये
१. वार्षिक उत्पन्न आठ लाखांची मर्यादा
२. प्रत्येक महाविद्यालय ५ टक्के जागा आरक्षित
३. सीईटी सेलच्या कॅप राऊंडमधूनच प्रवेश मिळणार
४. या योजनेसाठी वेगळी गुणवत्ता यादी तयार प्रसिद्ध केली जाते.
५. अर्ज करताना या योजनेचा पर्याय निवडणे आवश्यक
६. सर्व जाती, धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी योजना.