प्रॉपर्टी टॅक्स, वीजबिलांमध्ये सवलत हवी
पुणे – रिटेल कापड व्यावसायिकांना करोना परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. आता अनलॉक सुरू आहे. मात्र, दीड वर्षाचे नुकसान भरून काढण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा तरी कालावधी लागणार आहे. सध्या आर्थिक परिस्थितीला कापड व्यावसायिकांनाही सामोरे जावे लागत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी व्यावसायिकांना प्रॉपर्टी टॅक्स, वीजबिलांमध्ये सवलत मिळावी, अशी अपेक्षा आहे.
मागील वर्षी मार्चअखेरीस लॉकडाऊन लागू झाले. यामध्ये एप्रिल, मे महिना गेला. मुळातच शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने या काळात कापड दुकानदारांचा व्यवसाय होत असतो. पण, आता यंदाही तीच परिस्थिती आहे.
एप्रिल, मे महिने लॉकडाऊनमध्ये गेले आहेत. करोना सुरू झाल्यापासून व्यावसायिकांचा नेहमीच्या तुलनेत खूपच कमी व्यवसाय झाला आहे. तरीही कामगारांचे पगार, दुकानाचे भाडे द्यावे लागत आहे. सध्या बिकट परिस्थिती आहे. कर्जाचे हप्ते भरण्यास पैसे नाहीत. हळूहळू ही परिस्थिती सुधारेल. थोडा व्यापारही वाढेल.
तो पूर्ववत होण्यास सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कापड दुकानदारांच्या किमान या मागण्या मान्य केल्या पाहिजेत, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.
व्यापारी दरवर्षी स्थानिक, आयकर व्यवस्थित भरतो. युरोपीय देशांमध्ये लॉकडाऊन काळातील कामगारांचा 80 टक्के पगार सरकार देते. येथील व्यापाऱ्यांचीही सरकारकडून अशीच अपेक्षा आहे. प्रॉपर्टी टॅक्स, वीजबिलामध्ये सवलत दिली पाहिजे. कर्ज असलेल्या व्यापाऱ्यांना हप्ते न भरणे झाल्यास सवलत दिली पाहिजे. नुकसान भरून काढण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता सवलत दिली पाहिजे.
– दिनेश जैन, जयहिंद कलेक्शन.