पुणे – कचरा वाहतुकीची निविदा गुंडाळली

आरोपांच्या फैरींनंतर प्रशासनाचा निर्णय : 10 कोटी रुपयांची निविदा रद्द

पुणे – महापालिकेच्या पौड रस्ता आणि घोले रस्ता कचरा हस्तांतरण केंद्रावर जमा होणारा कचरा उरुळी देवाची येथील कचरा डेपोपर्यंत नेण्यासाठी काढण्यात आलेली 10 कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या मोटार वाहन विभागाने अतिरिक्त आयुक्तांना दिला आहे.

दरम्यान, “ब्लॅकलिस्ट’ असलेल्या कंपनीला बेकायदेशीर रित्या पात्र करण्यात आल्याच्या आरोपामुळे आणि याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आल्याने ही निविदा रद्द केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. पौड रोड आणि घोले रोड येथील कचरा हस्तांतरण केंद्रावरून ऊरुळी देवाची येथील कचरा डेपो पर्यंत कचरा नेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून निविदा मागवण्यात आली होती. महापालिकेच्या एकूण कामाच्या 25 टक्के टर्न ओव्हर असणे हा प्रचलित नियम असताना, या निविदेमध्ये 37.50 टक्के टर्नओव्हरची मागणी करण्यात आली होती. या कारणास्तव त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या निविदेला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर नियमात कचरा वाहतुकीच्या निविदेत ट्रक वाहनांची फिटनेस टेस्ट करणे बंधनकारक असताना या निविदेत फिटनेस टेस्टचा समावेश केलेला नाही. या निविदेसाठी आलेल्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट नसल्याबाबतचे हमीपत्र द्यावे लागते. असे असताना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या “ग्लोबल वेस्ट सेल मॅनेजमेंट प्रा.लि.’ या कंपनीला काम देण्यात आल्याचा आणि निविदेच्या अटी आणि शर्ती बदल केल्याचा आरोप महापालिकेतील विरोधकांनी केला होता. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली असून, दोनच दिवसामध्ये विरोधकांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर विविध तांत्रिक कारणे देऊन महापालिकेच्या मोटार वाहन विभागाने सदर निविदा प्रक्रियाच रद्द करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांना दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.