पुणे – ‘टेमघर’ यंदाही अर्धेच भरणार

सिमेंटच्या आच्छादीकरणासह दुरुस्ती अजूनही सुरू

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरण दुरुस्तीचे काम सुरू आहे. धरणाच्या दुरुस्तीमुळे टेमघर धरण यंदाही पूर्ण क्षमतेने भरले जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत होती. धरणाच्या भितींमधून धबधब्याप्रमाणे पाणी वाहत होते. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेलाच धोका निर्माण झाला होता. गळतीबाबत उपाययोजना केली नाही, तर धरणांचे आयुष्य कमी होते, हे वास्तव्य असूनही जलसंपदा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले होते. टेमघर धरणातून गळती वाढल्याचा मुद्दा गाजल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर धरणाची पाहणी केली. त्यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये धरण दुरुस्त करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला.

पाणी गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाकडून 100 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला. मागील अडीच वर्षांपासून धरण दुरुस्तीचे काम सुरू आहे. धरणात पाणी असताना हे काम करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे सर्वांत आधी टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडून देण्यात देण्यात आले. त्यानंतर दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले. धरणात 695 मीटर इतक्‍या उंचीपर्यंत पाणी साठविण्यात येत होते.त्यामुळे धरणात फक्त 60 टक्केच पाणीसाठा उपलब्ध होता. त्यानंतर 2018 मध्ये धरण दुरुस्तीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले होते. त्यामुळे 2018 मध्ये पाणीसाठ्यात वाढ करण्यात करून 80 टक्‍यांपर्यंत धरण भरण्यात येणार आले होते.

टेमघर धरण उभारताना गुणवत्ता राखली गेली नाही तसेच तांत्रिक उणिवाही राहून गेल्या. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरूच राहिली. प्रति सेंकद काही हजार लिटर पाणी वाहत होते. टेमघर धरणाची एकूण क्षमता 3.76 टीएमसी एवढी आहे. मात्र, धरणाच्या गळतीमुळे पूर्ण क्षमतेने धरण भरले जात नव्हते. त्यामुळे सुमारे एक टीएमसी इतका पाणीसाठा कमी होता. याचा परिणाम शेतीसाठीचे आर्वतन आणि पिण्याच्या पाण्यावरही होत आहे.

अधिकारी म्हणतात…
“सध्या तिसऱ्या टप्प्यातील धरणाच्या भितींची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरण केले जात आहे. हे काम पूर्ण होण्यास सुमारे नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे यंदा टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरले जाणार नाही,’ असे ाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.