पुणे – कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या आणि कायम शब्द वगळलेल्या 20 टक्के अनुदान मंजूर शाळांमधील शालार्थ आयडी न मिळलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जूनपर्यंतचे वेतन ऑफलाइन होणार आहे. त्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
यापूर्वी फेब्रुवारीपर्यंतचे वेतन ऑफलाइन अदा करण्यास मान्यता दिली होती. सद्य:स्थितीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने व कार्यालयीन उपस्थितीचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ क्रमांक मिळण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे जूनपर्यंत वेतन ऑफलाइन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास मान्यता दिल्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इ.मु.काझी यांनी दिले.
शासन निर्णयान्वये 61 माध्यमिक शाळांमधील 308 शिक्षक व 206 शिक्षकेतर पदे आणि 181 माध्यमिक शाळांच्या 543 वर्ग, तुकड्यांवरील 762 शिक्षक पदे अशा एकूण 1 हजार 70 शिक्षक व 206 कर्मचारी यांना ऑनलाइन वेतन मिळणार आहे. 167 प्राथमिक शाळांमधील 941 शिक्षक आणि 158 प्राथमिक शाळेच्या 623 वर्ग, तुकड्यांवरील 747 शिक्षक पदे अशा एकूण 1 हजार 688 शिक्षक पदाचे वेतनही ऑनलाइन देण्यात येणार आहे. 1 हजार 337 उच्च प्राथमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन जादा तुकडा, अतिरिक्त शाळांमधील 7 हजार 800 पूर्ण वेळ व 272 अर्धवेळ शिक्षक पदे व 748 शिक्षकेतर पदे अशा एकूण 8 हजार 820 शिक्षक व शिक्षकेतर पदाचे वेतन ऑफलाइन होणार आहे.