पुणे – शिक्षकच नाहीत, मग विद्यार्थी येणार कसे?

शाळांप्रश्‍नी सर्वपक्षीय नगरसेवकांचा मुख्यसभेत सवाल

पुणे – महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, अशा परिस्थितीत विद्यार्थी येणार कसे आणि शाळेत शिकणार कसे? असा प्रश्‍न मंगळवारी महापालिका मुख्यसभेत सर्वपक्षीय सदस्यांनी विचारला. या समस्येमुळे विद्यार्थी महापालिकेच्या शाळा सोडून खासगी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यामुळे शाळांची पटसंख्या कमी होत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. ती पटसंख्या कमी होऊ नये, ती वाढावी, यासाठी त्वरीत शिक्षक भरती करून शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी महापालिकेच्या मुख्यसभेत केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका प्रिया गदादे यांनी महापालिकेच्या शाळांमधील परिस्थिती आणि शिक्षणाचा दर्जा यावर प्रकाश टाकला. महापालिकेच्या शाळा सोडून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात खासगी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांचे दाखले अडवले जात आहेत. आपल्या शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता खरोखरच इतकी ढासळली आहे का, की आणखी काय समस्या आहेत हे तपासण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी अचानक शाळांना भेटी देऊन पाहणी करणे आणि त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत गदादे यांनी मांडले.

शिक्षणाची गुणवत्ता वाढविल्यास विद्यार्थी आपल्या शाळा सोडणार नाहीत. काही शिक्षक एकाच शाळेत वर्षानुवर्षे शिकवत आहेत, त्यांची बदली करणे गरजेचे आहे, असेही मत यावेळी मांडण्यात आले.

गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न
नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर महापालिका शाळांच्या शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत यांनी खुलासा केला. अनेक विद्यार्थी पाचवीनंतर कोठेही प्रवेश घेत नाहीत. त्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून हातामध्ये दाखले दिले जात नाहीत. कोणाचेही नुकसान करण्याचा यामागे उद्देश नाही, असे राऊत म्हणाल्या. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांची 90 पदे भरण्यासाठी शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रीया राबविली जात आहे. तसेच इंग्रजी माध्यमांसाठी 190 शिक्षकांची पदे भरण्यासाठी नुकतीच जाहीरात दिली आहे. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही माध्यमांच्या शाळांना शिक्षक मिळतील.

अतिरिक्त शिक्षकांची गरजेच्या रिक्त जागेवर बदली करण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच डीबीटीचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे, त्यामुळे महिना अखेर विद्यार्थ्यांना वस्तू मिळतील. एकंदरीतच शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी भविष्यात मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या वारंवार बैठका घेतल्या जातील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. काही शाळांमध्ये एका शिक्षकाला तीन-तीन वर्ग पाहावे लागतात. रिक्त जागांवर शिक्षकांची भरती केव्हा होणार आहे? याचा खुलासा प्रशासनाने तातडीने करावा.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर


मागील वर्षीचे गणवेशाचे पैसे अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत. ज्यांना मिळाले आहेत, त्यांना निम्मेच मिळाले आहेत.
– प्रवीण चोरबेले


शिक्षक नसल्याने बिबवेवाडी येथील महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थांना प्रवेश नाकारले जात आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण?
– राजेंद्र शिळीमकर


महापालिका शाळांतील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी वर्ग खोल्या आणि शिक्षक वाढविणे गरजेचे आहे. प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी.
– सचिन दोडके


पालिकेच्या अनेक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत, अशा शिक्षकांची रिक्त जागेवर बदली करावी. प्रशासनाने याबद्दल कार्यवाही करावी.
– राजाभाऊ लायगुडे


गेल्या दोन वर्षांपासून मी शिक्षकांची मागणी करत आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकच नसतील तर शिक्षणाचा दर्जा कसा वाढणार?
– शंकर पवार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)