पुणे – कर विभागाने ओलांडला 200 कोटींचा टप्पा

पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाने अवघ्या 27 दिवसांतच 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 27 एप्रिल अखेर मिळकतकरापोटी पालिकेच्या तिजोरीत सुमारे 215 कोटी 41 लाख रुपयांचा कर जमा झालेला आहे. सुमारे 2 लाख 20 हजार 164 मिळकतधारकांनी हा कर जमा केल्याची माहिती कर संकलन विभागाने दिली आहे.

महापालिकेकडून 2019-20 या आर्थिक वर्षांसाठी सुमारे 9 लाख मिळकतकराची बिले पोस्टाद्वारे नागरिकांना पाठविण्यात आली आहेत. त्यात नव्याने समाविष्ट 11 गावांमधील बिलांचाही समावेश आहे. तसेच प्रशासनाकडून 1 एप्रिल ते 31 मे या दोन महिन्यांत कर जमा करणाऱ्यांना मिळकतकरात 5 आणि 10 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलच पालिकेचा मिळकतकर भरला जातो. गेल्या 27 दिवसांत 1 लाख 29 हजार 905 मिळकतधारकांनी सुमारे 121 कोटी 39 लाख रुपयांचा कर ऑनलाइन स्वरूपात जमा केला आहे. तर 38 हजार 19 मिळकतधारकांनी सुमारे 63 कोटी 48 लाखांचा कर धनादेशाद्वारे पालिकेच्या तिजोरीत भरला आहे. तर 52 हजार 238 मिळकतधारकांनी 30 कोटी 53 लाख रूपयांचा कर रोख रकमेच्या स्वरूपात जमा केला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.