पुणे – अकरावी प्रवेशासाठी “सीईटी’ घ्या

राज्यभरातील 65.58 टक्‍के विद्यार्थ्यांचा होकार : सर्व्हेचा आज अंतिम दिवस

पुणे – राज्यात करोनामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्याची चाचपणी शालेय शिक्षण विभागाने सुरू केली. यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात दोन दिवसांत 65.58 टक्के विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’ घेण्यास होकार दर्शवला आहे. तर, 34.42 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा घेण्यास नकार दर्शविला आहे.

इयत्ता दहावीचा निकाल लावल्यानंतर इयत्ता अकरावी प्रवेश प्रकिया कशी राबवायची हा मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. शालेय शिक्षण विभागाने जुलैमध्ये 100 गुणांची ऑफलाइन सीईटी परीक्षा घेण्याचा विचार सुरू केलेला आहे. ही सीईटी ‘ओएमआर’ पद्धतीनुसार असावी, सर्व विषयांचा मिळून एकत्रित एक पेपर असावा, पेपरसाठी सुमारे 2 तासांचा वेळ असावा, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी “सीईटी’ परीक्षा घेण्यात यावी असे प्रस्तावित आहे. या “सीईटी’ परीक्षेच्या गुणांवरच अकरावी प्रवेश देता येतील का, याचा अभ्यास सुरू आहे.

11 मेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार असून यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात गेल्या दोन दिवसांत 2 लाख 73 हजार 935 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात सर्वांत जास्त महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील 1 लाख 79 हजार 658 विद्यार्थ्यांनी “सीईटी’ परीक्षा घेण्यास सहमती दाखवली आहे. तर 94 हजार 286 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नकार दिला आहे.

सर्वाधिक प्रतिसाद राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा
महाराष्ट्र बोर्डाच्या 2 लाख 53 हजार 471, आयसीएसई बोर्डाच्या 5 हजार 254, सीबीएसई बोर्डाच्या 8 हजार 344, आयबी बोर्डाच्या 342, इतर बोर्डाच्या 6 हजार 532 याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदवला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे, असे सांगण्यात आले.

सर्वेक्षणात जिल्हानिहाय सहभागी विद्यार्थी
अहमदनगर-11,855, अकोला-2,096, अमरावती-4,745, औरंगाबाद-5,559, भंडारा-1,702, बीड-3,095, बुलडाणा-3,813 , चंद्रपूर-2,932, धुळे-2,963, गडचिरोली-544, गोंदिया-1406, हिंगोली-929, जळगाव-7,864, जालना-1,977, कोल्हापूर-8,402, लातूर-4,578, मुंबई मनपा-26,478, मुंबई -31,772, नागपूर-8,670, नांदेड-2,951 , नंदुरबार-1,165, नाशिक-10,993, उस्मानाबाद-2,204 , पालघर-9,609 , परभणी-1,734, पुणे-29,376, रायगड-9,832 , रत्नागिरी-4,175 , सांगली-8,908 , सातारा-14,591, सिंधुदुर्ग-3,724 , सोलापूर-9,269, ठाणे-29,209, वर्धा-2,301, वाशीम-1,064, यवतमाळ -2,069.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.