कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांची मागणी
पुणे – चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या कामात ठेकेदार कंपनीला निविदांच्या अटीशर्तीचा भंग करून “अॅडव्हान्स’ देण्याची शिफारस करण्यात आल्याचा आरोप महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम “एल अॅन्ड टी’ आणि अन्य कंपन्यांना मिळाले आहे. त्यांना “अॅडव्हान्स’ रक्कम देण्याची शिफारस करणारा प्रस्ताव आयुक्तांपुढे स्वाक्षरीसाठी ठेवण्यात आला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी ही शिफारस केली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्रही शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.
पाणीपुरवठा विभाग प्रमुखांकडून ही लेखी शिफारस गेली असून, अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांच्या स्वाक्षरीने ती आयुक्तांकडे गेली आहे. मात्र अद्याप त्या शिफारस प्रस्तावावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली नाही. मात्र काम सुरू झाले नाही, केवळ पाइप येऊन पडल्यावर त्यांना कोट्यवधी रुपये “अॅडव्हान्स’ का द्यायचा, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. त्यातूनही अटीशर्तींचा भंग करून एवढे रुपये का द्यायचे असाही शिंदे यांचा सवाल आहे. पर्यायाने ज्या अधिकाऱ्यांनी निविदा अटीशर्तींचा भंग केला आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.