पुणे – करोना उपचार घेताना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर केवळ बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचे निदर्शनास येताच संबंधीत रुग्णालयावर कडक कारवाई करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत दिल्या आहेत. दरम्यान, करोनाच्या संभाव्य “तिसऱ्या लाटे’ची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावे आणि या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे पवार यांनी बैठकीत सांगितले.
करोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत पुण्यातील विधान भवन याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार संजय जगताप, सुनील टिंगरे, अशोक पवार, अतुल बेनके, माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यासह जिल्हाधिकारी, आयुक्त आदी पदाधिकारी उपस्थित होते.
करोनाच्या रुग्णांवर उपचार करताना सरसकट सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडे रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करता कामा नये, रेमडेसिविरबाबत गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करून दोषी रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले की, करोना प्रतिबंधाच्या दृष्टीने 45 वर्षांवरील नागरिकांबरोबरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी राखून ठेवण्यात आला आहे. परंतु, सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरळीतपणे होईल. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात निर्बंध लागू केले आहेत.