पुणे – कोथरूड येथील म्हातोबा टेकडीवर आग लागून अनेक झाडे नष्ट झाली आहेत. याची गंभीर दखल घेत टेकड्यांवर आग लावून वनराईला नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पुणेकर आणि टेकड्या यांचे नाते खूप जवळचे आहे. शहरातील टेकड्या फुफ्फुसे असल्याने टेकड्या संवर्धनासाठी चंद्रकांत पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. हरित कोथरूडसाठी ६५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवडीचा संकल्प करून महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागांतील टेकड्यांवर वृक्ष लागवड केली. त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६ हजार ५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्त्वाचे ठरणारे वृक्ष लावले असून, त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्थादेखील केली आहे.
मात्र, काही टवाळखोर या पर्यावरण संवर्धनाच्या कामात खोडा घालण्याचे काम करत आहेत. म्हातोबा टेकडीवर शनिवारी (दि. ४) तिसऱ्यांदा आगीची घटना घडल्याने येथील वनराईला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
“टेकडी हा पुण्याचा श्वास आहे. टेकड्यांवर चांगले वातावरण असल्याने नियमित व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, काही टवाळखोरांमुळे वनसंपदेचं नुकसान होत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. याशिवाय या घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी (दि. ६) सकाळी म्हातोबा टेकडीची पाहणी करणार आहे.” – चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री.