पुणे – फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारची गळा चिरुन निर्घुन हत्या करण्यात आली. ही घटना रात्री सव्वा बाराच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण थिएटरजवळ घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका तडीपार गुन्हेगारास अटक केली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ माजली आहे.
समीर जमील सय्यद ( 48, रा.खडक पोलीस लाईन, शुक्रवार पेठ) असे खून झालेल्या हवालदाराचे नाव आहे. तर सराईत गुन्हेगार प्रविण श्रीनिवास महाजन(रा.कसबा पेठ) याला खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तो करोणा पॉझिटीव्ह निघाल्याने त्याची रुग्णालयात रवानगी करण्यात आली.
महाजन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तीन ते चार शरीराविरुध्दचे गुन्हे आहेत. त्याला एक वर्षापूर्वी शहर व जिल्हयाच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. तो तडीपारीचा भंग करुन आला होता. त्याच्यावर यापुर्वीही तडीपारीचा भंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलीस हवालदार समीर सय्यद हे फरारसखाना पोलीस ठाण्यात डयुटी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांची ड्युटी संपल्यावर ते घरी गेले. यानंतर रात्री बाराच्या सुमारास ते श्रीकृष्ण थिएटर येथील अहिर हॉटेल येथे थांबले होते. तेथे तडीपार गुन्हेगार प्रविण महाजन हा आला.
“कालच सय्यद आणि पोलीस कर्मचारी यांनी रेड लाईट एरियामध्ये धान्याचे कीट वाटप केले होते. ते नेहमी तेथील महिलांना मदतीची काही गरज लागली तर धाऊन जात असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. त्यांच्या खूनामुळे त्यांच्या सहकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. त्यांच्यामागे पत्नी , दोन मुले आणि आई असा परिवार आहे”.
त्याची सय्यद यांच्याबरोबर बाचाबाची झाली. यानंतर रागाच्या भरात महाजनने सय्यद यांच्या गळ्यावर , पोटावर व छातीवर वार करुन त्यांचा खून केला. सय्यद रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षास माहिती दिली. फरासखाना पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यापुर्वी नागरिकांनी सय्यद यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषीत करण्यात आले.
पोलीस हवालदाराचा खून झाल्याचे कळताच पोलीस दलात खळबळ माजली. घटनास्थळी तातडीने अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, अजितकुमार पाटील व तेजस्वी पाटील दाखल झाले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करत आहेत.