पुणे – स्वाइन फ्लूचा विळखा कायम

शहरात डेंग्यूचाही वाढता प्रादुर्भाव


आरोग्य विभागाला जाग येणार का?

पुणे – शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना डेंग्यू, चिकुनगुणिया आणि मलेरियांच्या रुग्णांमध्येही वाढ होत असून, या आजारांवर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश आले नाही. मागील पंधरवाड्यात स्वाइन फ्लूने शहरात पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज चार ते पाच जणांना स्वाइन फ्लूची लागण होत असल्याचे समोर आले आहे.

शहरात उन्हाचा कडाका वाढूनही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. ढगाळ वातावरण आणि मध्येच उष्णता यामुळे वातावरणात बदल झाला असून, सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्याभरात 25 हून अधिक जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, सध्या 13 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन महिन्यांत 1 लाख 52 हजार व्यक्तींची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 61 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, 1 हजार 893 संशयितांना टॅमीफ्लूचे औषध दिले आहे. आतापर्यंत 22 जणांवर यशस्वी उपचार करून घरी सोडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

डेंग्यू आणि चिकुनगुणिया पाय पसरतोय
मागील दोन महिन्यात डेंग्यू आणि चिकुनगुणियाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, डेंग्यूचे 114 तर चिकुनगुणियाचे 30 रुग्ण आढळून आले आहे. या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील डासांच्या पैदासाची ठिकाणी नष्ट करणे आवश्‍यक असून, औषधफवारणी करणे आवश्‍यक आहे. परंतू, क्षेत्रीय कार्यालयाकडून औषधफवारणीबाबत उदासीनता दिसून येते. त्यामुळे आजार बळावत असून, आरोग्य विभागाने वेळीच खबरदारी घेणे आवश्‍यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.