पुणे – उन्हाचा कडाका वाढताच स्वाइन फ्लू पळाला?

 गेल्या 6 दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद नाही

पुणे – उन्हाचा वाढत्या तडाक्‍याने शहरात ठाण मांडून बसलेला स्वाइन फ्लू दहा दिवसांपासून गायब झाला आहे. त्यातच शहरातील तापमान 43 अंशावर गेल्यामुळे नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत.

पुणे शहरासह जिल्ह्यात जानेवारीच्या सुरूवातीलाच स्वाइन फ्लूने डोके वर काढले. त्यामध्ये एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला. दररोजच्या तपासणीमध्ये दोन ते तीन रुग्ण आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण होते. उन्हाळा सुरू होऊनही स्वाइन फ्लू कमी का होत नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. स्वाइन फ्लूची लागण झालेले 11 रुग्ण 20 दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. अवघ्या चार महिन्यांत तब्बल 112 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली, तर 4 हजार 116 संशयितांना टॅमीफ्लूचे औषध देऊन विश्रांतीचा सल्ला देण्यात आला.

परंतू, मागील दहा दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. सर्वसाधारण 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे तापमान 42 अंशांपर्यंत गेले. तर शनिवारी (दि. 27) 43 अंशापर्यंत तापमानाने मजल मारली. त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसांत एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळून आला नाही. सद्यस्थितीत 1 रुग्ण अतिदक्षता विभागात, तर 2 रुग्ण वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल बांधणे, स्वच्छ हात धुवून अन्नपदार्थ खाणे आणि उन्हाचा चटक्‍यापासून सावध रहावे, असे आवाहन डॉक्‍टरांकडून करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.