पुणे – महापालिकेच्या मिळकतींवर जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून संयुक्त जाहिरात धोरण राबविण्यात येणार आहे. या धोरणास मुख्यसभेने मान्यता दिल्यानंतर आता महापालिकेकडून या जाहिरातींच्या जागा शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठीचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. पुढील दोन महिन्यांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट केले.
या जाहिरातींमधून महापालिकेस वर्षाला सुमारे दीडशे कोटींचे उत्पन्न मिळेल, असे सांगण्यात येत आहे. या धोरणासाठी पुणे स्मार्ट सिटी निविदा प्रक्रिया राबविणार असून पुणे महापालिकेच्या माध्यमातून हे धोरण राबविले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेस मिळणाऱ्या उत्पन्नातील 2 टक्के निधी स्मार्ट सिटीला दिला जाणार आहे. मात्र, नेमक्या किती जागांवर या जाहिराती केल्या जाणार याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून जागा निश्चितीसाठी सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने शहरातील उड्डाणपूल, महापालिकेच्या इमारती, मोठी वाहने, सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प, विद्युत पोल, ऍमेनिटी स्पेस, मैदाने, क्रीडा निकेतनच्या शाळा, क्रीडा संकूले, सार्वजनिक स्वच्छतागृहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 10 ते 12 घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून हे सर्वेक्षण क्षेत्रीय कार्यालय तसेच संबंधित विभागांकडून करून घेण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.