श्वानावर अशाप्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच; डॉक्टरांचा दावा
पुणे – वजन कमी करण्यासाठी अनेकजण शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात. मात्र, ही शस्त्रक्रिया प्राण्यांवर करायचे म्हटल्यावर? होय पुण्यात एका श्वानाचे (कुत्री) वजन कमी करण्यासाठी “लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रॅक्टॉमी’ शस्त्रक्रिया करण्यात आली. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कुत्र्यावर शस्त्रक्रिया होण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
पुण्यातील कर्वेनगर येथील रहिवासी दारूवाला यांनी हा कुत्रा पाळला आहे. श्वानाला श्वास घेताना अडचण जाणवू लागल्यामुळे ती एकाच जागी बसून राहायची. अनेक औषधोपचार केले तरी फरक पडला नाही. त्यावेळी स्मॉल ऍनिमल क्लिनिकचे डॉ. नरेंद्र परदेशी यांची भेट घेतल्यावर अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
याबाबत लेप्रोस्क्रोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा म्हणाले, माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही लठ्ठपणा हा आजार वाढतोय. व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या व झोपण्याच्या वेळा अनिश्चित असल्याने प्राण्यांमध्ये वजन वाढू लागले आहे. देशात अनेक लठ्ठ पाळीव प्राणी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर, बॉक्सर, सेंट बर्नार्ड या भारतीय कुत्र्यांच्या प्रजाती असून त्यांना कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपदार्थ जास्त प्रमाणात दिले जाते. या श्वानाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. माणसांप्रमाणे या कुत्र्याला लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, सांध्यांचे विकार होते. श्वानाचे सरासरी आयुर्मान हे 12-15 वर्षे असते. परंतु, लठ्ठपणामुळे श्वानाचे आयुष्य सहा वर्षांनी कमी झाले आहे.
डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, प्रत्येक श्वानाचे वजन 18-20 किलो पाहिजे. परंतु, या श्वानाचे वजन तब्बल 50 किलो एवढे होते. शस्त्रक्रियेनंतर श्वानाला सात दिवस सूप देण्यात येत होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत श्वानाच्या वजनात पाच किलो घट झाली आहे.