पुणे – रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाढत्या मागणीमुळे जास्तीत जास्त रुग्णालयांना रेमडेसिविर पुरवण्यात येत आहेत. सध्या, काही प्रमाणात रेमडेसिविरचा पुरवठा कमी-अधीक झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून जास्तीत जास्त रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करून रुग्णालयांना दिला जात आहे. आज (दि. 7) दिवसभरात 622 कोविड रुग्णालयांना 3 हजार 985 रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन बेडच्या संख्येनुसार रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हाइल देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोमेंट क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांचा समावेश आहे.
संबंधित कोविड रुग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेण्यासाठी रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय, वाजवी दरात करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
पथकांची नजर…
पुणे जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दि. 11 एप्रिलपासून रेमडेसिविर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी भागात 6 भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहेत. त्याच्या मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांच्याकडील रेमडेसिविरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.