पुणे – शहरासह जिल्ह्यात थंडीचा लपंडाव सुरू असून दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री थंडी असे वातावरण अनुभवयला मिळत आहे. गेल्या २४ तासांत कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा जोर कमी आणि दुपारी उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून येते.
१३ अंशापर्यंत खाली आलेल्या किमान तापमानात आज एक ते दोन अंशाने वाढ झाली. तर कमाल तापमानही ३० अंशाच्या पुढे गेले. मात्र, शहराच्या पश्चिम भागात थंडी चांगली जाणवत असून, अन्य परिसरात हलकासा गारवा जाणवत आहे.
शुक्रवारी (दि. ८) दिवसभर उन्हाचा चटका जाणवत होता. तर सायंकाळी सातनंतर हवेत गारवा पसरल्यामुळे बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. दरम्यान, पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. तर काही भागात धुके पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.