पुणे – कळवा आणि दिवा स्थानकादरम्यान धिम्या कॉरिडॉरवर पाचव्या आणि सहाव्या लाइनच्या कामासाठी 24 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. 2 जानेवारी रोजी रात्री 2 वाजल्यापासून ते 3 जानेवारी रात्री 2 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.
1 जानेवारी रोजी सुटणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, 2 जानेवारी रोजी सुटणाऱ्या मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, 3 जानेवारी रोजी सुटणाऱ्या आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, गदग-मुंबई एक्स्प्रेस रद्द होणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
1 जानेवारीपासून पुण्यात येणाऱ्या वेळापत्रकात बदल
हावडा, बनारस, अमरावती आदी ठिकाणांहून पुणे स्थानकात येणाऱ्या रेल्वेंच्या वेळापत्रकात 1 जानेवारीपासून अंशत: बदल होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. हावडा-पुणे-हावडा एक्स्प्रेस दररोज सकाळी 7.20 वाजता पुणे येथे पोहोचणार आहे, तर दर गुरूवारी बनारस-पुणे-बनारस साप्ताहिक एक्स्प्रेस, दर शुक्रवारी अमरावती-पुणे-अमरावती साप्ताहिक एक्स्प्रेस, दर रविवारी दरभंगा-पुणे-दरभंगा साप्ताहिक एक्स्प्रेस सकाळी 7.05 वाजता पुणे स्थानकात दाखल होणार आहे.
या मार्गात अंशत: बदल
1 जानेवारी रोजी सुटणारी हुबली-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-कोयना एक्स्प्रेस पुणे स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. 2 जानेवारी रोजी सुटणारी दादर-हुबली एक्स्प्रेस दादरऐवजी पुणे स्थानकातून आणि मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबईऐवजी पुणे स्थानकातून सुटणार आहे.